📱 तेरा-चौदा वर्षांची ‘रील’ दुनिया – पालक म्हणून आपण कुठे आहोत...?
✍️ ©® सुरजकुमारी गोस्वामी, हैद्राबाद
संध्याकाळी सहज इंस्टाग्राम स्क्रोल करत होते.
रील्स एकामागोमाग एक सुरू होत्या.
तेरा-चौदा वर्षांची मुलं-मुली — आजूबाजूला अजून दूधदुभतं चाललेलं वय — पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र ‘टुटा दिल’, ‘बेवफा सनम’, ‘तू किसी और का है’ अशी प्रौढ भावनांची झळाळी.
क्षणभर वाटलं, एवढं लवकर प्रेमात पडणं, तुटणं, सावरणं, सगळं घडून गेलंय का खरंच?
कॅप्शन बघितली तर डोळे विस्फारले –
"आपना टाईम आयेगा",
"तू नाही, तर कुणीच नाही",
"मनात फार चालतं रे..."
एक क्षण बैचेन झाले.
माझ्या छत्तिशी वयातदेखील अशी आत्ममग्न ‘फीलिंग’ वाटलेली नाही...
मग ह्या मुलांना काय झालंय?
🤳 स्मार्टफोनचा अधिकार, पण मार्गदर्शनाची अनुपस्थिती
मुलांच्या हातात स्मार्टफोन देणं आज अपरिहार्य झालंय.
ऑनलाईन शिक्षण, गेम्स, संवाद — हे सगळं हवेच.
पण त्या फोनसोबत आपण किती वेळ देतोय त्यांना?
- आपण त्यांचं ऐकतो का?
- त्यांचं डिजिटल वागणं समजून घेतो का?
- त्यांचे मित्र, फॉलो केलेली अकाउंट्स, शेअर केलेले विचार – हे आपण पाहतो का?
स्मार्टफोन दिला म्हणजे पालकत्व पूर्ण झालं, असं नाही.
स्मार्टफोनसोबत स्मार्ट संवाद द्यावा लागतो.
🧠 मुलांची भावना ‘रील’ आहे, ती आपण ‘रिअल’पणे समजून घ्या
आजची पिढी फक्त वयानेच लहान आहे, पण माहितीच्या महासागरात पोहताना त्यांना आधाराची गरज आहे.
ते जे पोस्ट करत आहेत, ते त्यांच्या भावनांचं दर्शन आहे.
कधी राग, कधी हुरहूर, कधी आत्मकेंद्रितता —
हे सगळं त्यांच्या मनात चाललंय, आणि आपण बहुतेक वेळा फक्त मोबाईलवर ‘पालक नियंत्रण’ लावतो, पण मनावर कुणाचंच लक्ष नाही.
🗣️ पालक म्हणून करायच्या ५ महत्त्वाच्या गोष्टी:
-
रोज १०-१५ मिनिटं मुलांशी संवाद साधा.
शिकवायचं नाही – फक्त ऐकायचं. -
मोबाईल आणि सोशल मीडियाचे नियम ठरवा – एकत्र.
सक्तीने नव्हे, चर्चेने. -
त्यांचे मित्र, आवडती गाणी, ट्रेंड्स याबाबत रुची ठेवा.
त्यांना वाटू द्या की तुम्ही त्यांच्या दुनियेतले आहात. -
त्यांना प्रेमाने 'नाही' म्हणायला शिका.
प्रत्येक हौस पूर्ण करणे म्हणजे प्रेम नाही. -
भावनिक गोंधळ लक्षात घ्या.
जर मुलं सतत उदास वाटणाऱ्या गोष्टी शेअर करत असतील, तर थांबा, बसा, आणि बोला.
❤️ पालकत्व म्हणजे फक्त जबाबदारी नव्हे, ती एक सजीव नाळ आहे...
आपण अनेक वेळा म्हणतो – “आमच्या वेळी असं नव्हतं.”
हो, खरंच नव्हतं.
पण त्यावेळी जग संथ होतं, आणि आजच्या जगाची स्पीड वेगळीच आहे.
म्हणूनच पालक म्हणून आपली जबाबदारी आता जास्त आहे.
आपल्या मुलांना मोबाईलचा पासवर्ड दिला असेल,
तर त्यांच्या मनाचा पासवर्ड विसरू नका.
🙏 शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं...
मोबाईल देणं तंत्रज्ञानाचं दान आहे,
पण संवाद देणं हे माणूसपणाचं वरदान आहे.
📌 हे वाचत असलेले प्रत्येक आई-बाबा, मावशी-काका, शिक्षक, तरुण वाचक – एकदा स्वतःला प्रश्न विचाराच...
"मी त्यांच्या आयुष्यात फक्त फोन देणारा व्यक्ती आहे, की सतत उपस्थित असलेली सावली?
.....®©<सुरजकुमारी गोस्वामी हैदराबाद
No comments:
Post a Comment